Shri Bhausaheb Maharaj Umdikar
नामस्मरणाने सर्व कार्यसिध्दी होते.

आठवणी
  श्री भाऊसाहेब महाराजांच्या पुण्यप्रद आठवणी   त्यांच्या जीवनातील प्रसंग :


                                         
                   देव राम होऊन आला, कृष्ण होऊन आला, निंबर्गीमहाराज होऊन आला असे महाराज वारंवार

सांगत. निंबर्गीमहाराजांना आपादमस्तक स्वरूपदर्शन झाले होते.त्यांनी ब्रह्मा, विष्णू व महेश या तिघांनाही

पाहिले होते. त्यांचा सृष्टि-स्थिति-लय या तीनही शक्तींवर अधिकार चालत असे. भाविकांना परमात्म्याचा

साक्षात्कार करून देण्याकरिता त्यांनी स्वर्गातून दिव्य नाम आणले होते. अशा शब्दांत भाऊसाहेबमहाराज

सद्‌गुरूंची थोरवी वर्णीत असत
.


***********************************************************************************************************


                                                           
                     महाराज एकदा आपल्या सदगुरूंच्या सानिध्यात नेमास बसले असता एका भुंग्याने त्यांच्या मांडीस

दंश केला. त्यायोगे मांडीतून रक्तस्त्राव होऊ लागला. पण आसन न सोडता आपला नेम पूर्ण करूनचे ते

उठले. रानात ते साधन करीत असताना साप, विंचू इ. प्राणी त्यांच्या जवळून गेले किंवा अंगावर चढले तरी ते

स्थिर असत. तसेच रात्रीचे दोन तासांचे साधन ते जवळजवळ मुद्दाम बांधून घेतलेल्या भिंतीच्या मध्ये उभे

राहून करत. आपली कृपादृष्टी असू दे. असे म्हटल्यास, मी सांगितल्याप्रमाणे रोज तीन वेळा दृष्टी ठेवून नेम

केलात तर कृपा आहे असे समजा, असे महाराज म्हणत. आपली कृपा असावी, असे शिष्यांना म्हटले तर

बाबा म्हणत. तुम्ही नेम केला तर कृपा असतेच. नेम नाही केला तर अवकृपा आहे असे समजा.

 
श्री भाऊसाहेब महाराजांनी त्यांच्या आकरा शिष्याना दिलेले चांदीचे कडे                                                                                                                                        
                                                                                                                               
                                                  

                   सप्ताहाच्या उत्सवात स्वयंसेवक म्हणून चांगले काम करण्यास सिध्द असलेल्यांना व चांगले भजन

म्हणणार्‍या शिष्यांना महाराजांनी चांदीचे कडे करून दिले होते. त्या कडयावर अकरा मारूती कोरले होते.

शिवाय सर्व स्वयंसेवकांनाही महाराज स्वखर्चाने गणवेष देत असत. अशा तर्‍हेने प्रत्येकी अकरा

स्वयंसेवकांचे असे तीन गट महाराजांनी तयार केले होते. रामदासांनी अकरा मारूतीच्या मूर्ती स्थापन केल्या.

आम्ही अकरा सजीव मारूतींची स्थापना केली. असे महाराज म्हणत असत. अकरा मारूतीच्या स्वयंसेवक

दलातील हे साधक पुढील कामे करत-सभामंडपाची झाडलोट करणे, जेवावयास वाढणे, जेवण झाल्यावर

उष्टी काढणे, सारवणे वगैरे. हातात चिपळया घेऊन स्वतः महाराज भजनात उभे असत. कोणी चुकले किंवा

कोठेतरी बेसूरपणा दिसून आला की, ते स्वतः त्यांच्यापुढे उभे राहून त्यांना बरोबर घेऊन भजन व्यवस्थित

म्हणवून घेत असत. भजनानंतर आरतीत कापूर बेताने घालून, आरती व जयगुरू जयगुरू म्हणून होईपर्यंतच

कापूराची ज्योत राहिली पाहिजे व आरती लावली असताना कोणी मध्ये येऊ नये याची काळजी घेतली जात

असे.


**************************************************************************************************
                         
                   
                     दुपारच्या भजनात काय सांगू या समर्थाची थोरी  भजकासी आपणासी ऐसे करी  हे पालुपद

म्हणताना साधकांना ते नाचावयास लावावयाचे. जोरात भजन करीत नाचत असताना साधकांना घाम येत

असे. तो घाम महाराज स्वतः आपल्या डोक्यावरील पटक्याने पुसून काढीत. तेंव्हा अशा प्रेमळ वागण्याने

आपल्या आई-वडीलांपेक्षा महाराजच आपल्यावर जास्त प्रेम करतात असे शिष्यांना वाटे.
**************************************************************************************************
             
                  
                 भजनाच्या वेळी सर्व शिष्य समोरासमोर दोन ओळी करून भजन करीत असत. महाराजांनी

कन्नुरच्या हणमंतरावांना विचारले, समोरच्या ओळीतले लोक भजन करीत असताना तू काय करीत

असतोस? तेंव्हा ते आपल्यापेक्षा चांगले भजन करतात का, ते मी पाहत असतो, असे हणमंतरावांनी उत्तर

दिले. तेंव्हा महाराज त्यांना म्हणाले, तू नामस्मरणाबरोबर उजव्या टाचेने ठेका धरत जा म्हणजे तू नामस्मरण

करतोस की नाही ते मला कळेल. भजन करीत असतानाही नामस्मरण चालू ठेवले पाहिजे अशी महाराजांची

शिकवण होती.**************************************************************************************************


                
             एकदा कन्नुर मुक्कामी असता, रात्री अंथरूणावर पडून पाच मिनीटे झाल्यावर आपल्या शेजारी

झोपलेल्या कन्नुरच्या हणमंतरावांना महाराजांनी विचारले. आता तू काय करीत आहेस? उगाच पडून राहिलो

आहे. असे हणमंतरावांनी उत्तर दिले. त्यावर महाराज म्हणाले, उगीच पडून राहणे ठीक नव्हे. नामस्मरण

करीत पडावे. (स्वतः पडल्या ठिकाणीच दीर्घ श्वासेच्छवासाबरोबर नामस्मरण कसे करावे हे दाखवून दिले)

तसे केल्याने झोप लागेपर्यंत नामस्मरण चालू राहते व जाग आल्याबरोबर तेच आठविते.


***************************************************************************************************

                   
                              महाराज जतमध्ये असतांना त्यांच्या मोठया मुलाने, कृष्णाजीपंताने आपल्या घरी वरिष्ठ

अधिकारी, तहसिलदार व काही सहकार्‍यांना जेवावयास बोलावले होते. जेवतांना काहीही न बोलता जेवण

करून महाराज उठून गेले. बाकीचे जेवण संपेपर्यंत गप्पा गोष्टी करीत होते. अधूनमधून ते इंग्रजी भाषेत

बोलत होते. जेवण संपल्यानंतर त्यांना कोणत्या विषयावर बोलत होता? असे महाराजांनी विचारले. जतच्या

राजेसाहेबांनी चांगल्या जातीचा कुत्रा पाळला आहे. त्या कुत्र्यामध्ये कोण-कोणत्या जाती आहेत त्याबद्दल

आम्ही बोलत होतो, असे त्यांनी सांगितले. त्यावर महाराज म्हणाले ’ज्या देवाने अन्न दिले त्याचे स्मरण न

करता कुत्र्याचे स्मरण करत तुम्ही जेवण केले.’


************************************************************************************************


                    एकदा इंचगिरीत श्रावण सप्ताह चालू असताना फार मोठा पाऊस पडला. त्यामुळे जवळच्या

ओढयाला खूप पाणी येऊन ते मठात शिरू लागले. तेंव्हा मठातील भक्तगण घाबरून गेले. आपल्या सर्व

मुलाबाळांना आपल्या बरोबर आणले, एखाद्याला जरी घरी सोडून आले असते तरी तो वाचला असता असे

सप्ताहाला आलेली एक बाई म्हणू लागली. तेंव्हा शिष्याने मठात पाणी शिरल्याचे महाराजांच्या कानी घातले.

महाराजांनी आपल्या माडीतील पूर्वेकडील खिडकी उघडून तेथून दिसणार्‍या बांधावर दृष्टी ठेवली व

वस्तूदर्शन घेऊन ते आत येऊन नेमास बसले. ताबडतोब बांध फुटला व सर्व पाणी वाहून गेले. शिष्यांची

चिंता दूर झाली. नंतर पोथीचा अर्थ सांगतांना. पडता जड भारी  दासी आठवावा हरी  मग तो होऊ नेदी सीण

आड घाली सुदर्शन  हरिनामाच्या चिंतेने  "बारा वाटा पळती विघ्ने " हा तुकारामांचा अभंग म्हणून महाराज

म्हणाले, देवाने सुदर्शन चक्र घालून तो बांध फोडला.


************************************************************************************************
 

                        इंचगिरीस गुरूदेव एक इंग्रजी ग्रंथ वाचत बसले असता महाराज तेथे आले आणि ग्रंथातील

आशय अचूकपणे सांगितला. महाराजांना इंग्रजी मुळीच येत नव्हते. गुरूदेवांचा आश्चर्यचकित चेहरा पाहून

महाराज म्हणाले, भाषा तरी कोणी निर्माण केल्या? देवानेच ना! मग ज्याने देवाला जाणले त्याला एकच का,

छप्पन्न भाषा सहज जाणता येतील! नंतर महाराज म्हणाले, माझ्या डोळयावर एक दगड बांधा आणि या

भिंतीपलीकडे लिहिलेला एक कागद धरा, मी तो कागद वाचून दाखवितो.**************************************************************************************************

                               १९११ साली महाराज चिम्मडकडे परमार्थ प्रसारासाठी गेले असता जालीहाळच्या

हणमंतरावांना पण आपल्याबरोबर घेऊन गेले होते. वाटेत सर्व गावात प्लेगची साथ होती. कोटयाळ येथे

हणमंतरावांना ताप येऊन ते बडबडू लागले. गाडी करून त्यांना जालीहाळला पाठवून देऊ असे

महाराजांनी सांगितले. त्याला हणमंतराव कबूल झाले नाहीत. सावळगीला हणमंतरावांच्या काखेत प्लेगची

मोठी गाठ दिसून आली. तेथील बाळप्पा देसाई त्यांना औषध देत होते. त्यांना निराशा वाटल्याने, त्या मुलाचा

(तेव्हा हणमंतराव अकरा वर्षाचे होते) आजार बरा होण्याचे लक्षण दिसत नाही, हे औषध तुम्हीच द्या, असे

त्यांनी महाराजांना सांगितले. महाराजांनी, वैद्यांनी दिलेल्या गोळया हातात घेऊन त्यावर आपली दृष्टी ठेवून

त्या हणमंतरावांना दिल्या. त्या दिवशी संध्याकाळचा नेम त्यांनी उभ्याने केला. ते उतरलेल्या धर्मशाळेच्या

आतील भागात रात्रीचे भजन चालू असताना पाऊस असल्याने बाहेर झोपलेल्या हणमंतरावांना पाऊस

लागतो काय पाहायला महाराजांनी रामभाऊ तिकोटकरांना पाठविले. तेंव्हा झोपेतून जागे झालेल्या

हणमंतरावांचा ताप उतरला होता. (अप्पा) महाराज कोठे आहेत? असे, तिकोटेकरांना त्यांनी विचारले. आत

भजन चालू आहे हे ऐकून हणमंतराव रामभाऊंचा हात धरून भजनाच्या ठिकाणी गेले. तेव्हा भजनात

आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा  माझिया सकळा हरिच्या दासा  हे चालले होते. त्यानंतर भक्त

विठ्ठलनामाचा गजर करत नाचू लागले. हणमंतरावांना अशक्तपणा आला असल्याने ते एका खुंटीला धरून

उड्या मारू लागले. हे पाहून सद्‌गदित झालेले महाराज म्हणाले, हा मुलगा वाचेल की नाही असे वाटत होते.

देव त्याला भजनात नाचवत आहे. ही रोकडी प्रचिती होय. व नंतर भजन पुढे चालू ठेवले.


******************************************************************************************************
   


                                 इंचगेरी येथील देवालयाच्या शिखराजवळील खोलीत महाराज नेमास बसले होते.

एकदा ते नेमातून उठून खाली आले व एका शिष्याला म्हणाले, हे पहा, इतक्या दिवसात आज मला

निंबर्गीमहाराजांचे दर्शन झाले, भाऊराया, केवढा हा भक्तीचा थाट! पाहून आनंद आनंद झाला पाहा ! असे

निंबर्गीमहाराज म्हणाले, तसेच महाराजांना एकदा सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी पोथीवर फुले वाहत

असताना श्रीसमर्थ तेथे उभे असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.**************************************************************************************************

                                 
                                 एकदा नेमास बसल्यावेळी महाराज भावाविष्ट होऊन बाहेर आले आणि आपल्या

भक्तांना उद्देशून त्यांनी त्रिवार घोषणा केली, आता तुम्हाला हवे असेल ते मागा, इतके म्हणून थोडावेळ

थांबून नंतर ते खोलीत जाऊन पुन्हा नेमास बसले, हे वाक्य ऐकून सगळेच चकित झाले होते. बर्‍याच वेळाने

ध्यान संपवून बाहेर आल्यावेळी एका शिष्याने पृच्छा केली तेंव्हा महाराज म्हणाले, काय सांगू तुम्हाला तेव्हा

साक्षात भगवंत आला होता. तुम्ही मागितलेले सर्व काही त्याने दिले असते. आता मी काय देऊ शकणार? श्री

रामकृष्ण परमहंसानाही अशीच अवस्था प्राप्त व्हायची.**************************************************************************************************


                                     १९१३ साली मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी महाराज सोलापूरास असताना त्यांच्या

एका शिष्याने महाराजांसमोर, "उभी ठेवूनी कर कटीं"  हे पद मोठया भावपूर्ण अंतःकरणाने गायिले. ते पद

ऐकत असताना त्यांच्या डोळयांतून सारख्या अश्रूधारा वाहत होत्या. त्यावेळी त्यांना प्रत्यक्ष श्री पांडुरंगाचे

दर्शन होत असावे. या प्रसंगाचे श्रीरामभाऊ रानडे हे साक्षीदार होते. 
 


 

© copyright: Shree Bhausaheb Maharaj Trust Umdi
Powered By builtCMS