Shri Bhausaheb Maharaj Umdikar
नामस्मरणाने सर्व कार्यसिध्दी होते.

उमदी मठ पूर्वपीठिका

 


उमदी मठाचे पूर्वावलोकन :


                           उमदी येथील श्री भाऊसाहेब महाराजांच्या वाडयाची त्यांच्या निर्याणानंतर बरीच पडझड झाली

होती.महाराजांच्या नेमाच्या खोलीची पण तीच अवस्था होती. श्री गुरूदेवांना, त्यांच्या उमदी भेटीत हे लक्षात आले.

सद्‌गुरूंच्या ऋणांतून अंशतः मुक्त होता येईल म्हणून श्रीगुरूदेवांनी महाराजांच्या तपोभूमीचा, त्यांच्या नेमाच्या

खोलीचा, जीर्णोध्दार करण्याची इच्छा श्री. पांडुरंगराव बापट (कॉन्ट्रॅक्टर) यांचे जवळ बोलून दाखविली. तात्काळ श्री.

पांडुरंगरावांनी श्रीगुरूदेवांच्या इच्छेप्रमाणे श्री बाबासाहेब संगोराम यांच्या मार्गदर्शनाखाली त्या जागेचा जीर्णोध्दार

१९५६ साली केला. 

                            १३ मे १९५७ रोजी नागपूरहून श्री गोखले यांनी महाराजांच्या पादुका निंबाळ येथे

श्रीगुरूदेवांच्याकडे पाठविल्या. पादुकांचे पार्सल नव्या घरामध्ये देवापुढे पाटावर ठेवण्यात आले होते. २८ मे रोजी श्री

बाबुराव गोखले,श्रीगुरूदेवांच्या भेटीसाठी निंबाळला गेले असता श्रीगुरूदेव त्यांना म्हणाले, पादुका तुमच्या बरोबर

उमदीस घेऊन जा.त्याप्रमाणे नंतर २० सप्टेंबर रोजी श्री बाबुराव गोखले स्वतः निंबाळला गेले व त्यांनी ती काकूसाहेब

यांच्याकडून त्यांच्या अनुमतीने महाराजांच्या पादुका उमदीस नेल्या. 


              विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती विजापूरचे वारकरी श्री वाठारकर यांनी पंढरपूराहून आणून त्या श्री बापट यांचे घरी

ठेवल्या होत्या. महाराजांच्या पादुका उमदी येथे आणल्यानंतर श्री फकीरप्पा यांस विजापूरास पाठवून त्या मूर्ती

उमदीस आणल्या गेल्या. श्री भाऊसाहेब महाराजांनी ज्या श्रध्देने पांडुरंगाची स्थापना इंचगेरी येथे सद्‌गुरूंच्या मठात

केली त्याच भावनेचा आदर करून महाराजांची इच्छा प्रमाण मानून, त्यांच्या इच्छेची पूर्तता व्हावी म्हणून उमदी येथील

नित्यनेमाच्या खोलीत विठ्ठल-रखूमाईच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 


                                श्रीभाऊसाहेब महाराज यांच्यावरील उत्कट प्रेमाने विठुमाऊलीस आपल्या भक्ताच्या

जन्मस्थानी,त्यांच्या तपोभूमीस, उमदीस यावे लागले. जसे आपल्या प्राणप्रिय भक्त पुंडलिक यानी केलेल्या

विनंतिनुसार विठुमाऊली  प्रसन्न होऊन त्याची वाट पाहत युगानुयुगे पंढरीत उभी आहे. तसेच महाराजांच्या

इच्छापूर्तीसाठी त्यांच्या उमदी निवासी नामसाधनेने पुनीत झालेल्या महाराजांच्या खोलीत साधकांची वाट पाहात

माऊली उभी आहे. महाराजांच्या विठ्ठल ऐक्याचे हे सगुणरूपच नाही का? उमदी येथे नित्य विठ्ठलाचे व महाराजांच्या

पादुकांचे भजन, पोथी व नामस्मरणाने पूजन होत आहे. 
     
                वे.शा.सं. लक्ष्मण भटजी हे महाराजांचे शिष्य होते. ते वैदिक ब्राह्मण तसेच विद्वान व संस्कृत पंडीत होते. ते

महाराजांच्याबरोबर फिरतीवर जात. महाराज व बाबा प्रवचनात दासबोधाचा जो अर्थ सांगत तसा अर्थ लक्ष्मण भटजी

सांगत इतकी त्यांची योग्यता होती. त्यामुळे श्रीगुरूदेवांचे त्यांच्यावर अतिशय प्रेम होते. त्यांचा हा अधिकार जाणूनच

श्रीगुरूदेवांच्या दहनभूमीवर १२ व्या दिवशी लक्ष्मण भटजींच्या हस्ते औदुंबराचे झाड लावण्यात आले. लक्ष्मण भटजी

यांनी पादुका व मूर्ती यांची प्रतिष्ठापना करण्यासाठी अश्विन
वद्य पंचमी, दि. १४ ऑक्टोंबर १९५७ सोमवार हा दिवस

ठरविला. अश्विन
वद्य प्रतिपदा ते पंचमी असा पाच दिवसांचा सप्ताह संपन्न झाला. पंचमीस दि- १४/१०/५७ रोजी

सोमवारी आधी योजिल्याप्रमाणे सकाळी साडे दहा वाजता पादुकांची व विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीची समंत्रक

प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. फुले पडून सप्ताह समाप्तीनंतर महाप्रसाद झाला. त्या उत्सवास श्रीमंत राजेसाहेब

 मिरज, श्री काकासाहेब कारखानीस, बाबासाहेब संगोराम, डॉ खानोलकर, वाली प्रांतऑफीसर, श्रीमती सोनूताई

कब्बूर व नानासाहेब हरिदास वगैरे पुष्कळ ज्येष्ठ व श्रेष्ठ साधक मंडळी उपस्थित होती. 
  
           श्रीभाऊसाहेब महाराजांचा, आपल्या सद्‌गुरूंच्या सगुण प्रतिकाविषयीचा भाव दर्शविणारा हा प्रसंग.

निंबर्गीहून मुखवटा व पादुका आणण्यासाठी इंचगेरीहून काही साधक मंडळी गेली होती. मठाजवळ पालखी येताच

आपल्या सद्‌गुरूंच्या पादुका व मुखवटा यांच्या स्वागतासाठी श्रीभाऊसाहेब महाराज स्वतः मैल दीड मैल अनवाणी

चालत गेले होते. 

 




 
© copyright: Shree Bhausaheb Maharaj Trust Umdi
Powered By builtCMS