Shri Bhausaheb Maharaj Umdikar
नामस्मरणाने सर्व कार्यसिध्दी होते.

श्री भाऊसाहेब महाराज पीस फाऊंडेशन विश्वस्त मंडळ

 
           
                              


                                   
                                          महाराजांचे चिरंजीव श्री भिमराव यांचे पुत्र व्यंकटेश उर्फ तम्मण्णा यांचे श्रीगुरूदेवांकडे येणे-जाणे

होते. श्री गुरूदेवांनी ४ ते ५ वर्षे त्यांना निंबाळास ठेवून घेतले होते. महाराजांचा नातू म्हणून श्रीगुरूदेवांचे त्यांच्यावर

विशेष प्रेम होते. ते अत्यंत भोळे व भाविक असल्याने स्वतःच्या लौकिक व्यवहाराकडे त्यांचे दुर्लक्ष होत होते.

गुरूदेवांच्यावर त्यांची फार भक्ति होती. श्रीगुरूदेवांकडून त्यांनी नाम घेतले होते. ते उत्तम पदे म्हणत असत. त्यांना

श्रीगुरूदेवांनी उमदी येथे पोस्ट काढून दिले होते. १९५७ पासून पुढे ४-५ वर्ष पोस्टाचे काम पाहताना मठात

काकडआरतीपासूनचे सर्व कार्यक्रम ते पार पाडीत असत. त्यांच्या बरोबरच श्री गोखले काका यांनी उमदी मठाचा

कार्यभार सांभाळला, असे त्यांच्या चिरंजीवांनी सांगितले. त्यांचे एक चिरंजीव श्री रंगराव त्यांच्या वाटणीस उमदी येथील

महाराजांच्या वाडयाचा बराच भाग आला होता. ते स्वतः रामनवमीचा, अश्विन वद्य पंचमी व माघ शु. तृतिया हे उत्सव

साजरे करीत. ही वास्तू त्यांच्या खाजगी मालकीची असल्याने आपणा सर्व साधकांच्याकडून फारच दुर्लक्षित राहिली.

तेथे जाऊन परमार्थ साधण्यासाठी लागणार्‍या सोयी उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे महाराजांच्या निर्याणानंतर म्हणजे

१९१४ पासून ते २००३ पर्यंत म्हणजे जवळ जवळ ९० वर्ष महाराजांची ही जन्मभूमी, तपोभूमी साधकांच्या पासून

वंचित राहिली. त्यामुळे उमदीचे पारमार्थिक महत्त्व जपता आले नाही, याचा लाभ सर्व साधकांना घेता आला नाही,

ही अत्यंत दुर्देवाची गोष्ट आहे, खरी श्रीगुरूदेव वर्षातून एकदा उमदीस जाऊन महाराजांच्या नेमाच्या खोलीत व

महाराजांनी ज्या ज्या ठिकाणी नेम करून जी स्थाने पवित्र केलेली होती त्या त्या ठिकाणी जाऊन कापूर लावीत

असत.

              महाराजांच्या कृपेने व साधकांच्या सद्‌भाग्याने काही साधकांनी पुढाकार घेऊन श्री रंगराव देशपांडे

(महाराजांचे पणतू) यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आपल्या पणजोबांची कीर्ति वाढावी, त्यांच्या वास्तव्याने पुनीत

झालेल्या वास्तूत परमार्थ वाढावा या सदिच्छेने, उदार अंतःकरणाने, नेमाच्या खोलीची व बाजूची पुष्कळ जागा

श्रीभाऊसाहेब महाराज पीस फौंडेशन या ट्रस्टला देणगी म्हणून दिली. हे त्यांचे उपकार केंव्हाही फेडता येणार

नाहीत. त्यांचे हे ऋण आपणावर कायमचे राहील. आज ते ट्रस्टचे आजीव ट्रस्टी आहेत.

           
                     श्रीमहाराजांच्या आशीर्वादाने दि २५/६/२००३ रोजी श्रीभाऊसाहेब महाराज पीस फौंडेशन या ट्रस्टची

स्थापना झाली. ट्रस्टच्या स्थापनेनंतर साधकांना उमदी येथे येऊन राहण्यासाठी आवश्यक त्या सोयी करण्यात आल्या.

उदा- राहण्याची व्यवस्था, स्वंयपाकघर, स्वच्छता गृहे, कोठी वगैरे. ध्यानमंदिराचीही दुरूस्ती होणे जरूरीचे होते. तेही

काम साधकांच्या सहाय्याने पूर्ण झाले. उमदीस पाण्याचे दुर्भिक्षच आहे. नुकतीच बोअर वेल काढल्यामुळे पाण्याची

काळजी मिटली आहे. या सर्व गोष्टी महाराजांच्या कृपेनेच होत आहेत हा अनुभव पदोपदी येत आहे. १९५७ साली

श्रीगुरूदेवांनी जीर्णोध्दार केलेल्या महाराजांच्या या वास्तूत त्यांच्याच कृपेने परमार्थ वाढत जाईल यात शंकाच नाही.

अशा क्षेत्रांत नेम करावयास मिळणे हे साधकांचे परमभाग्यच होय. महाराजांच्या व श्रीगुरूदेवांच्या कृपेचा लाभ घेऊन

स्वतःचा आत्मोध्दार करून घेण्याचे भाग्य जास्तीतजास्त साधकांना मिळावे ही त्या दोघांच्या चरणी नम्र नम्र प्रार्थना. 
 
     
                                                                
© copyright: Shree Bhausaheb Maharaj Trust Umdi
Powered By builtCMS