Shri Bhausaheb Maharaj Umdikar
नामस्मरणाने सर्व कार्यसिध्दी होते.

श्री निंबर्गी संप्रदाय


श्री निंबर्गी महाराजांचे अल्पचरित्र :    

                                                             
                          निंबर्गी महाराज या थोर सत्‌पुरूषाचा जन्म इ.स. १७८९ साली लिंगायत जातीतील नीलवाणी या पोट जातीत

झाला. त्यांचे पूर्णनाव नारायणाराव मिसळकर होते. त्यांना गुरूलिंगजंगम महाराज असेही लोक

संबोधित. त्यांच्या घराण्याचे मूळ पुरूष धारवाड जिल्हयातील कुपेनूर या गावी राहत असत. यांचे

पणजे मंगळवेढयातून निंबरगी या गावी येऊन राहिले. महाराजांचा जन्म सोलापूर येथे आजोळी

झाला. पण त्यांचे सर्व आयुष्य निंबरगीसच गेले.

            निंबरगी महाराज शरीराने उंच, धिप्पाड व खूप सशक्त होते. त्यांचा वर्ण गोरा होता व  कान फार मोठे होते.

त्यांची बुध्दी अतिशय तीव्र होती.बालपणी त्यांना खेळण्याचा फार नाद होता. व त्यासाठी वडिलांकडून बर्‍याचवेळा

रागे भरून घ्यावे लागे. एकदा वडील रागावले असता महाराज त्यांना म्हणाले सर्व लोक खेळ खेळतात तसा माझा

खेळ नाही. मी एक अगदी निराळा खेळ खेळून दाखविणार आहे.

          ते सुमारे २०-२५ वर्षाचे असताना शिमग्याच्या खेळात खेळून फार उशीरा घरी आले. वडील त्यांना खूप

रागावले. त्यामुळे मनास वाईट वाटून ते कोणास न कळविता पंढरपूरास निघून गेले. तेथे त्यांनी तीन दिवसाचा

उपवास केला. तिसरे दिवशी तू सिध्दगिरीस जा म्हणजे तेथे तुझी मनीषा पूर्ण होईल असा त्यांना दृष्टांत झाला.

सिध्दगिरी हे स्थान कोल्हापूर जवळ आहे. तेथे आपल्या मुलीचे जावळ काढण्यासाठी ते गेले. तेथे देवदर्शन घेतल्यावर

देवळाजवळच्या एक गुहेजवळून जात असता त्या गुहेत असणार्‍या एक वृध्द साधून हाताने खूण करून आपल्या

जवळ येण्यास सांगितले. ते पाहून फार आतुरतेने जवळ जवळ उडी मारूनच ते त्यांच्याजवळ गेले. त्यावेळी त्या

साधुपुरूषाने त्यांना उपदेश दिला. व मी सांगितल्याप्रमाणे साधन केलेस तर तुझी किर्ती दिगंतात होईल असे

सांगितले. वरील साधुपुरूष म्हणजे मुप्पिन मुनी असावेत.
       
           श्री महाराजांनी केलेल्या पदात मुप्पिन मुनीय पिडीदु वचना असा जो उल्लेख आहे., तो त्यांच्या गुरूंच्या

नावाचा असावा. अनुग्रह घेऊन घरी आल्यावर सुमारे सहा वर्षे महाराजांचे हातून फारसे साधन झाले नाही. सहा

वर्षानंतर त्यांना साधनाने आठवण देण्यासाठी ते वृध्द साधू निंबरगीस त्यांचेकडे आले. तेंव्हा त्यांना महाराजांनी भोजन

घालून चार आणे दक्षिणा दिली. त्यावर साधूने दोन रूपये दक्षिणा मागितली. त्यांनी दोन रूपये दुसरीकडून आणून

त्यांना दिले. ते दोनही रूपये त्यांना परत देऊन ते साधू म्हणाले, त्यातील एक रूपया तुझ्या संसारासाठी व एक रूपया

परमार्थासाठी तू घे. त्यावर नामस्मरण केले असता प्रपंचही सुखाचा होतो काय? असा प्रश्न विचारला त्यावर साधू

म्हणाले देवाच्या कृपेला काय अशक्य आहे? त्यानंतर महाराज अंतःकरणपूर्वक साधनास लागले. वयाच्या ३१ ते ६७

वर्षापर्यंत प्रपंचात राहून अविश्रांत साधन केले आणि प्रपंच व परमार्थ दोन्ही साधले. अशा प्रकारे परमार्थातील अत्युच्च

पद मिळविल्यानंतर आपल्या आयुष्यातील पुढील २८ वर्षे स्वतःच्या नियमित साधनात खंड पडू न देता लोकांना

परमार्थाचा उपदेश करून त्यांचा उध्दार केला.

           प्रथम ते निळार्‍याचा म्हणजे नीळ तयार करण्याचा व सूत रंगविण्याचा आपला पिढीजात धंदा करीत असत.

परंतु मेंढया राखण्याचा धंदा परमार्थ साधण्यास अधिक अनुकूल आहे असे पाहून परमार्थासाठी पुढे ते धनगर बनले.

आपल्या शेळया मेंढयाचा कळप व गुराख्यांची दोन चार मुले बरोबर घेऊन ते निंबरगीच्या आसपासच्या भागातील

कोणत्यातरी दर्‍याखोर्‍या असलेल्या रानात जात तेथे शेळया मेंढया चरण्यास सोडून त्यांना सांभाळण्याचे काम

बरोबरच्या गुराख्यांवर सोपवून ते स्वतः एखाद्या निवांत जागी संध्याकाळपर्यंत साधन करीत असत. या प्रमाणे जेथे

पडली दृष्टी रघुरायाची या रामदासांच्या उक्तीप्रमाणे तो सर्व प्रदेशच त्यांनी पावन करून टाकला. अशा रितीने पूर्णपणे

परमार्थ साधून ते संसारातून निराळे झाले.

           श्री निंबरगी महाराजांचे आयुष्य शांतपणे, दक्षपणे, प्रपंच व परमार्थ करण्यात गेले. त्यांच्या आचरणाच्या बळाने

त्यांचा संसार निर्विघ्नपणे पार पडून सुखाचा झाला. त्यांची मुले नातवंडे कोणालाही अपमृत्यु आला नाही किंवा कोणी

फारसे आजारीही पडले नाही. आपले आचरणच आपले बळ होय हे तत्त्व जाणून त्यांनी आपले आचरण ठेवले होते. ते

परमार्थात उत्साहित व प्रपंचात उदास असले तरी त्यांनी आपल्या प्रपंचाची हयगय केली नाही. प्रपंच खबरदारीने व

विवेकाने केला. पुढे आपली मुले मोठी झाल्यावर प्रपंच त्यांच्या स्वाधीन करून ते आत्मचिंतनात मग्न होऊन राहिले.

            श्री निंबरगी महाराजांचा सर्व काळ आत्मचिंतनात व शिष्यांना उपदेश करण्यात जात असे. त्यांनी आपला

परमार्थ अत्यंत गुप्त ठेवला होता. ते अत्यंत गुप्तपणे साधन करीत. एकदा अनुग्रह दिला म्हणजे शिष्याची सर्व

जबाबदारी आपणावर घ्यावी लागते हे ते जाणून होते. गुप्तता बाळगल्याने त्यांचा शिष्यवृंद परिमित होता. त्यातील

बरेचजण परमार्थातील उच्च पदवीस पोहोचले होते.अशा रितीने प्रपंच व परमार्थात विरोध नाही. ईश्वराची भक्ती

केल्याने अभ्युदय व निःश्रेयस या दोन्हीची प्राप्ती होते. म्हणजे प्रपंचही सुखाचा होतो. व आत्मप्राप्तीही होते. हे आपल्या

उदाहरणाने सर्वांना दाखवून दिले.

          इ.स. १८८५ मध्ये चैत्र शुध्द १३ रात्री १२ वाजण्याच्या सुमारास आपल्या वयाच्या ९५ व्या वर्षी निंबरगी येथे

त्यांनी आपला देह ठेविला.
 
       निंबरगी येथे त्यांच्या समाधी मंदिरात चैत्र शुध्द ९ ते १३ पर्यंत दरवर्षी निंबरगी महाराजांची पुण्य-तिथी निमित्त

सप्ताह साजरा होतो. 
© copyright: Shree Bhausaheb Maharaj Trust Umdi
Powered By builtCMS