Shri Bhausaheb Maharaj Umdikar
नामस्मरणाने सर्व कार्यसिध्दी होते.

श्री रघुनाथप्रिय महाराज





 

             श्री साधुबुवा हे श्री निंबरगी महाराजांचे प्रमुख शिष्य होते. त्यांचा जन्म आंध्र प्रांतात एका श्रीमंत घराण्यात झाला.

परंतु बालवयातच बैरागी होऊन घराबाहेर पडले. त्यांनी हिंदुस्थानभर यात्राᅠकेल्या. ते एकदा निंबरगी जवळील

सोनगी गावी येऊन राहिले. ते लंगोटी नेसून वर कफनी घालीत. सोनगीस असता सिध्दीचा सामर्थ्याने ते लोकांचे रोग

बरे करीत व पुष्कळ अन्नसंतर्पण करीत. त्यांना वाचनसिध्दी होती. त्यामुळे त्यांची आसपास फार प्रसिध्दी झाली.

सगुण भक्ती, व्रत्ते, अनुष्ठाने व अन्नसंतर्पण करणे हाच खरा परमार्थ अशी त्यांची समजूत होती. शिष्य मंडळींनी श्री

निंबरगी महाराजांना साधुबुवांना पाहण्याचा फार आग्रह धरला. श्री निंबरगी महाराज आपल्या शिष्यासह साधुबुवांच्या

भेटीस गेले. साधुबुवांनी विशेष आदर दाखविला नाही.

              आपण अन्नसंतर्पण, अनुष्ठाने कशा करीता करता? असा महाराजांनी त्यांना त्याना प्रश्न केला. हा पुण्यमार्ग

आहे म्हणून मी या गोष्टी करीतो असे उत्तर दिले. त्यावर हा पुण्यमार्ग कशावरून? पुण्य तुमच्या डोळयांना दिसते का?

असे तुमचे पुण्य किती साठले आहे असे महाराजांनी विचारले. त्यांची उत्तरे साधुबुवांना देता आली नाहीत. त्यांच्या

अंतःकरणाला चटका लागला.

            आपल्या बरोबर आलेल्या मंडळींना तेथेच ठेवण्याची त्यांनी विनंती केली. त्यांची विनंती मान्य करून महाराज

निंबरगीस परत आले. राहिलेल्या मंडळीकडून ऐकल्यावर महाराज व त्यांचे परमार्थ साधन या बद्दल साधुबुवांचे

मनात कुतूहल उत्पन्न झाले.

              एके दिवशी पहाटे ते महाराज जेथे साधन करतात त्या भागात जाऊन जवळ असलेल्या एका निंबाच्या

झाडावर चढून बसले. महाराज संध्याकाळ पर्यंत साधनातून उठले नाहीत. त्यामुळे साधुबुवांनाही झाडावरच बसावे

लागले. साधन संपवून महाराज घरी निघाले. तेंव्हा साधुबुवांनी खाली उतरून त्यांना नमस्कार केला. तुम्ही इतका वेळ

कोठे होतात असे महाराजांनी विचारले. मी झाडावर बसून होतो. असे साधुबुवा म्हणाले. आतापर्यंत उपाशीच होता

का? असे विचारताच मी निंबाचा पाला खाल्ला असे म्हणाले. निंबाचा पाला खाऊन देव मिळाला असता तर प्रथम

उंटाला मिळाला असता. हे ऐकून आधीच मृदु झालेल्या अंतःकरणामुळे त्यांनी महाराजांचे चरणी डोके ठेवून आपण

उध्दार करावा. अशी प्रार्थना केली. त्यांची योग्यता जाणून महाराजांनी त्यांच्यावर अनुग्रह केला. काही दिवस

निंबरगीत राहून पुढे गुरूआज्ञेने उमदीस १२ वर्षे तेथील मारूती मंदिरात राहिले. १२ वर्षे तेथे कठोर साधन केले. व

परमार्थातील उच्च पदवी प्राप्त करून घेतली. त्यावर गुरू आज्ञेने परमार्थाचा प्रसारही केला. त्यांची गुरूभक्ती उत्कट

होती

                  साधुबुवा जवळपासच्या गावात परमार्थ प्रसारासाठी जात. असेच एकदा चिम्मड   येथे  गेले असता तेथे

आजारी पडले. त्यांच्या प्रकृतीची काळजी वाटू लागली. आपण आणखीन काही दिवस राहावे. आपल्या भक्तांना

सोडून जाऊ नये. आपण गेलात तर भक्तीचा आधार जाईल. अशी त्यांच्या शिष्य मंडळींनी आग्रहाची विनंती केली.

त्यांच्या विनंतीस मान देऊन पुढे ते एक वर्ष राहिले. पुढील वर्षी परत चिम्मड   येथे  गेले असता तेथेच त्यांनी देह

ठेवला. त्यांचे शिष्य रामभाऊ यरगट्टीकर यांनी विहिरीमध्ये देऊळ बांधले आहे. 
                                                     
                                                          
© copyright: Shree Bhausaheb Maharaj Trust Umdi
Powered By builtCMS