Shri Bhausaheb Maharaj Umdikar
नामस्मरणाने सर्व कार्यसिध्दी होते.

ग्रंथ संपदा
  महाराजांचे पारमार्थिक साहित्य (लेखन):


 नेमावली-
                   
       
                           १९१० पर्यंत चिम्मड येथे होणारे भजनच आपल्या सांप्रदायातही म्हंटले जात होते. श्री महाराजांचे मनात,

चिम्मड येथे झालेल्या एका प्रसंगावरून, आपले स्वतंत्र भजन असावे असे वाटले. श्री महाराजांच्या बरोबर श्री गुरूदेव

होते. त्यांना श्री महाराजांनी स्वतंत्र भजनावली करण्यास सांगितली. श्री गुरूदेव व महादेव भटजी फिरतीवर असताना

पहिले पाहता श्रीमुख या अभंगाने नेमावलीची सुरूवात करावी असे ठरले. श्री महाराजांनी येऊन तोच अभंग प्रथम

घेण्यास सांगितला. दोघांनाही आश्यर्च वाटले. श्री गुरूदेवांनी हस्तलिखित तयार केले. श्री महाराजांनी छापण्याची

जबाबदारी सोलापूरचे साधक विष्णुपंत फडके यांच्यावर सोपवली. १९११ मध्ये नेमावलीची पहिली आवृत्ती छापून

तयार झाली. यास प्रदीर्घ प्रस्तावना श्री गुरूदेवांनी लिहिली. पण खाली नाव मात्र घातले नाही. त्यावर श्री महाराज

म्हणाले, बघा सर्व काही करून आपण मात्र नामा निराळा राहिला आहे.

  नेमावली मध्ये सांप्रदायाचा पूर्व इतिहास, महाराजांचे अल्प चरित्र, त्यांचा आत्मज्ञानावर भर, याचे विवरण दिसून येते.

एका अधिकारी सद्‌गुरूंचे शिष्याने केलेले हे वर्णन आहे.


 


महाराजांची पत्रे-

                                                       
श्री भाऊसाहेब महाराज उमदीकर यांची जावक पत्रे व टिपणे

         


                                              यात एकूण २६२ पत्रे आहेत. श्री महाराजांनी आपल्या शिष्यांना लिहिलेल्या पत्रात अतिमोलाचा

उद्‌बोधक व स्फूर्तिदायक उपदेश केलेला आहे. याशिवाय सांप्रदायाचा इतिहासही मोठया प्रमाणात अंतर्भूत केलेला

आहे. यात महत्त्वाच्या ऐतिहासिक गोष्टीही कळतात. महाराजांची नामनिष्ठा, चौफेर दृष्टिकोन, नैतिक तत्त्वावरील दृढ

श्रध्दा, स्पष्ट दिसते. पत्रातील मध्यवर्ती सूत्र म्हणजे नेम त्याच्याभोवती इतर विषयांची गुंफण आहे. श्री गुरूदेवांना

त्यातील प्रत्येक शब्दांत महाराज दिसत असत. श्री गुरूदेवांच्या दृष्टिने या पत्रापेक्षा श्रेष्ठ वाड़ःमय जगात नाही असे ते

म्हणत. महाराजांची पत्रे म्हणजे साक्षात्काराचे लेखन आहे. मनोरंजन, बौध्दिक भरार्‍या किंवा काव्य नव्हे. महाराजांचा

प्रत्येक शब्द त्यांना देवाचा शब्द होता.
 


*********************************************************************************************************************************************************महाराजांच्या डायर्‍या:


                   महाराजांच्या डायरीत परमार्थ हाच मुख्य विषय होता. नेम-पोथि-भजन या नित्यक्रमाच्या नोंदी यात होत्या.

कोणाला नाम दिले. सप्ताह  झालेल्या गावांच्या नोंदी याचे टाचण असे. सर्वात जुनी डायरी १८९५ ची असून १९०४ ते

१९१४ अशा सर्व डायर्‍या उपलब्ध आहेत. गुरूदेव म्हणत हा आमचा ग्रंथसाहेबच आहे. महाराजांचा रोजचा ७

तासाचा नेम व पाच तास भजन, पोथी  यात कधीही खंड पडलेला नाही. याशिवाय महाराज रात्री दोन तास नेम करीत.

गुरूदेव म्हणत, यांचा सूक्ष्म अभ्यास करणे म्हणजे नेमच आहे. यांच्या परिशीलनामुळे अंतःकरण पवित्र होते, नेमास

जोर येतो, मनास आनंद व उत्साह वाटतो व प्रचितीस वेळ लागत नाही.

 

 
दासबोधसुधा:

     
                                            
                    श्री समर्थ रामदासस्वामींच्या दासबोध या ग्रंथाचे सार म्हणजे दासबोधसुधा हा ग्रंथ होय. मुळात एकूण सात

हजार सातशे ओव्या आहेत. त्यापैकी एक हजार सातशे अकरा ओव्या या ग्रंथात निवडून घेतल्या आहेत. श्री

भाऊसाहेब महाराजांनी स्पष्ट केलेला विशेष अर्थ भाष्यामध्ये आला आहे. श्री महाराज दासबोधावर निरूपण करीत.

समर्थ रामदासांच्या दासबोधाचे व निंबरगी सांप्रदायातील गुरूंच्या उपदेशाचे सार यथार्थ रितीने देण्याचे अवघड काम

या ग्रंथात केले आहे.
 
 
© copyright: Shree Bhausaheb Maharaj Trust Umdi
Powered By builtCMS