Shri Bhausaheb Maharaj Umdikar
नामस्मरणाने सर्व कार्यसिध्दी होते.

श्री भाऊसाहेब महाराज चरित्र

                                                                     


                                         
                                                                                                                    
                                                                                     

             श्री  महाराजांचा जन्म शके १७६५ (इ.स.१८४४) मध्ये रामनवमीच्या पुण्यदिनी उमदी येथे झाला. त्यांचे नाव

व्यंकटेश असे ठेवण्यात आले. पण ते भाऊराव म्हणूनच ओळखले जात. वयाच्या १२-१३ वर्षापर्यंत त्यांना सगुण

भक्तीचीच आवड होती. उमदी गावातील मारूतीचे देऊळ हे जागृत स्थान म्हणून प्रसिध्द आहे. याच मंदिरातील

ओवरीत साधुबुवांचा (श्री रघुनाथप्रियमहाराजांचा) मुक्काम असे. साधुबुवांचे १२ वर्षे उमदीस वास्तव्य होते. त्यांची १२

वर्षाची साधना याच मारूती मंदिरात झाली. दरवर्षी चै. शु. तृतियेस श्री महाराज त्यांच्या पुण्यतिथीचा उत्सव साजरा

करीत. जवळजवळ २२ वर्षे महाराजांनी साधुबुवांची पुण्यतिथी उमदी येथे साजरी केली. महाराज रोज या मारूतीची

पूजा करून त्यास प्रदक्षिणा घालीत असत. साधुबुवांनी या भाविक मुलाची पारमार्थिक योग्यता ओळखली व त्यांचे मन

सगुणाकडून निर्गुणाकडे ओढून घेण्यासाठी त्यांच्या भाविक वृत्तीची ते सकौतुक स्तुति करीत. काय तुझी भक्ति श्रेष्ठ !

काय तू पुण्यवान ! असे म्हणून त्यांच्या ते पायाही पडत. अशा रीतीने पडी घेऊन उलथवावे या समर्थ रामदासांच्या

वचनाप्रमाणे साधुबुवांनी त्यांचे मन खर्‍या भक्तीकडे वळविले व १८५७ साली त्यांना वयाच्या १४ व्या वर्षी

श्रीनिंबर्गीमहाराजांकडे नेऊन नाम देवविले. श्रीनिंबर्गीमहाराजांनी आशिर्वाद देऊन महाराजांना सांगितले की,

भाऊराया तुला दिलेले नाम माझे नव्हे, ते स्वर्गातून आलेले आहे. तुझे त्याकडे निरंतर ध्यान असू दे.

             नाम मिळाल्यापासूनच अत्यंत निग्रहाने व निश्चयाने त्यांनी उमदीस नामस्मरण (नेम) करण्यास सुरूवात

केली. सकाळी ते गावाबाहेर दूर रानात नेमास जात, ते मध्यान्हीच स्नान करून परत येत. पोथी भजन उरकून भोजन

झाल्यावर थोडयाशा वेळात लौकिक कामे आटोपत. याप्रमाणे २८ वर्षे शरीरकष्टाची पर्वा न करता उमदीस कठोर

साधन (नामस्मरण) केले. त्यांचा अनुभव वाढत गेला. तसेच वैराग्यही वाढत गेले. त्यांच्या भाग्याने, निंबर्गीमहाराजांचे

इ.स.१८८५ साली निर्याण झाले, त्याआधीच परमार्थ वाढविण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांनी महाराजांचेवर सोपविली.

सद्‌गुरूंच्या निर्याणानंतर अत्यंत दुःख विव्हळ होऊन महाराजांनी दुप्पट जोराने उमदी येथे नामस्मरण करून

अद्वैतसिध्दि मिळविली. या कालात पुढील १८ वर्षे महाराजांनी उमदी येथेच अहोरात्र नेम केला. महाराज नित्य आपला

१२ ते १३ तासाचा वेळ, नेम, पोथी, भजन, या साधनेत घालवित असत. बाकीच्या वेळात देव करील तेच होणार या

निष्ठेने आपल्या प्रपंचातील कामे करीत. कोणत्याही परिस्थितीत आपल्या नेमाच्या वेळा ते काटेकोरपणे पाळीत.
  
               निंबर्गीमहाराजांच्या निर्याणानंतर महाराजांनी उमदी येथे श्रावण सप्ताह सुरू केला. हा सप्ताह स. १८८५

पासून १९०३ पर्यंत १८ वर्षे उमदीस महाराजांच्या वाडयात स्वखर्चाने केला जाई. यावेळी बरेच साधक आपले साधन

वाढविण्यासाठी सप्ताहास येत म्हणून यास साधन सप्ताह असे म्हणत असत. या सप्ताहातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट

म्हणजे सकाळी सहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत असे ९ तास सर्व साधक महाराजांच्याबरोबर नेमास बसत असत. एका

साधकाकडे पोथी वाचण्याचे काम असे. या सप्ताहास अनेक जेष्ठ व श्रेष्ठ साधक येत असत. त्यामध्ये श्री भाऊराव

सावळसंग, श्री अंबुराव महाराज व शिवलिंगव्वा अक्का यांचाही समावेश असे.
                                           
                 आपल्या वाडयातील चौसोप्यातील एका लहानशी खोली महाराजांनी आपल्या नित्यनेमासाठी ठेवली

होती. आपल्या नेमाच्या खोलीच्या भिंतीला लागून मध्यभागी एका मनुष्यास उभे राहण्याइतकी रूंदीची जागा सोडून

दोन फुट अंतरावर दुसरी भिंत महाराजांनी बांधून घेतली होती. आपल्या खांद्याच्या उंचीबरोबर, मध्ये एक माणूस उभा

राहू शकेल. इतकी जागा सोडून दोन्ही भिंतीत दोन बांबू बसवून घेतले होते. या मध्ये उभे राहून रात्री १२ ते २ पर्यंत

कठोर साधन सतत १८ वर्षे महाराजांनी केले. शरीर कष्टाची तमा न बाळगता केलेल्या या कठोर साधनाने महाराजांचे

अंगी प्रखर वैराग्य बाणले. अशा वैराग्याबरोबर आत्मसाक्षात्काराचे शिखर गाठण्याइतका त्यांचा स्वानुभव वाढला.

महाराजांनी या नेमाच्या खोलीतील अणु-रेणूवर देव पाहिला होता. साक्षात्कारी पुरूषाने जेथे वस्तू पाहिली ती

पुण्यभूमीच होय.
                                                         
                 आपल्या सद्‌गुरूंचे समाधी मंदिर पूर्ण व्हावे व त्यावर आपण कळस ठेवावा, या उत्कट इच्छेने

महाराजांनी पांडुरंगास साकडे घातल्याचे दिसते. हा त्यांचा संकल्प पूर्ण झाल्यावर आपण केलेला नवस फेडण्यास

आपल्या शिष्यासह महाराज १९१० साली पंढरपूरास गेले. पंढरपूर हे तर संतांचे माहेरघरच तसेच भक्तीचे थोर  केंद्र

होय. तेथे जो सोहळा झाला. त्याचे वर्णन त्यांच्या सोबत गेलेल्या श्री शिवलिंगव्वा अक्का यांनी  एका पत्रात केले आहे.

               "  पंढरपूरास गेल्यावर महाराजांनी दंडवत घालून नवस फेडला. नमस्कार घालून झाल्यावर महाराजांनी

विठुमाऊलीस आलिंगन देऊन त्याची भेट घेतली. महाराज व पांडुरंगाची भेट म्हणजे तो एक आनंदाचा अभूतपूर्व

सोहळाच होता. महाराज विठ्ठल भेटी झाली. आकाशातून पुष्प वर्षाव झाला, तो सोहळा वर्णन करता येत नाही. ज्यांनी

दृष्टि देऊन पाहिली त्यांना ते दिसले. महाराज पांडुरंग एक झाले."

                   पंढरपूराहून महाराजांनी, अंबूरावमहाराज यांना लिहिलेल्या पत्रांतून विठुमाऊली बद्दलच्या आपल्या

भावना व्यक्त केल्या. देवाचे नवस संपूर्ण आनंद आनंद जाहला. आम्ही पौष शुध्द ३ अगर ४ इंचगेरीस येत आहोत.

साक्षांत विठ्ठलराजास आणीत आहोत. तुमचे भक्तीने विठुराया येत आहे. आपल्या सद्‌गुरूंच्या सगुण रूपातील

समाधीबरोबर पांडुरंगाचीही नित्य सेवा घडावी या भावनेने महाराजांनी विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

निंबर्गीमहाराजांच्या समाधी मंदिरातील गाभार्‍यात मागील भिंतीतील कोनाड्यात  केलेली दिसते.

                     अशा रितीने श्रीनिंबर्गीमहाराजांच्या निर्याणानंतर २८-२९ वर्षे भक्ती प्रसाराचे कार्य महाराजांनी

उत्कृष्टपणे केले. महाराजांनी आपला देह परमार्थाच्या प्रसारासाठी चंदनाप्रमाणे झिजवला व शेवटी वयाच्या ७१ व्या

वर्षी ता. २९/१/१९१४ रोजी (माघ शुध्द तृतिया शके १९३५) इंचगेरी येथे ते समाधिस्थ झाले. आत्मसाक्षात्कारी पुरूष

देवाचा अनुभव घेत देह कसा ठेवतो हे महाराजांच्या निर्याणसमयी दिसून आले. ते देवाकडून आले व देवाकडे गेले.श्री महाराजांचा नित्य दिनक्रम :


पहाटेचा नेम ५ ते ८, सूर्योदय झाल्यावर कांही वेळ माडीवर जाऊन सूर्याकडे पाहत नेम करीत असत.

या नेमानंतर गुरूआज्ञेप्रमाणे १०० ओव्या ज्ञानेश्वरीच्या, १०० ओव्या दासबोधाच्या, ३० मनाचे श्लोक असे त्यांचे रोजच

पारायण असे. त्यानंतर कापूर लावून ५ नमस्कार घालीत.

दुपारच्या जेवणानंतर १ तासाचा नेम असे. त्यानंतर पत्रव्यवहार व हिशोब पाहत.

संध्याकाळी ५ वाजता पोथी , भजन, आरती होत असे. संध्याकाळी ६ ते ९ असा ३ तासांचा नेम असे. नंतर भजन,

आरती होत असे.

रात्री १२ ते २ असा दोन तासाचा नेम असे.

               प्रवासातही ते या आपल्या नेमाच्या वेळा चुकवित नसत.खाता जेविता नाम विसरू नये. समर्थांच्या या

वचनाप्रमाणे अखंड नामस्मरणाचे शिखर महाराजांनी गाठले होते.बैलगाडीतून प्रवास करताना तोंडावर पांघरूण

घेऊन नेम साधीत. घोडयावरून प्रवास करताना बसल्या बसल्या नेम करीत असत. 
  

  

© copyright: Shree Bhausaheb Maharaj Trust Umdi
Powered By builtCMS